पैशांचा पाऊस; मांत्रिक बाप लेकाचा जामीन न्यायालयाने फेटाळला

0
पुणे : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी घरातील व्यक्तिचा नरबळी द्यावा लागेल असे सांगून व्यावसायिकाची फसवणूक करणार्‍या मांत्रिक बाप-लेकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. कैलास रामदास सोळुंके (वय 22) याचा नियमित जामीन तर रामदास सोळुंके (दोेघेही रा. वाळुंज, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद) याचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला.
धायरी येथील 40 वर्षीय व्यावसायिकाने याबाबत सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून दोघांचा पोलिस शोध घेत आहे. हा प्रकार 2016 पासून 25 ऑक्टोंबर 2020 च्या दरम्यान पुण्यातील धायरी व जालना येथील हिवरखेडा गावात घडला. आरोपींनी व्यावसायिकाकडून 52 लाख रुपये देखील उकळले आहेत. आरोपी व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना पैशाचा पाऊस पाडून देतो असे सांगून छोटीशी पूजा करावी लागणार असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून वेळोवेळी 52 लाख 1 हजार रुपये घेतले. तसेच, घरातील एक नरबळी देऊन तो शेवटचा विधी करावा लागेल असे सांगून दहा रुपयांपासून दोन हजारांपर्यंतच्या बनावट नोटा दाखवून फसवणूक केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी कैलास याने नियमित जामीन तर रामदास याने अटकपुर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला. गुन्ह्यातील कैलास व रामदास हे बाप लेक आहेत. कैलास यास जामीन मंजुर केल्यास तो गुन्ह्यात पसार झालेले त्याचे वडील रमादास व त्याची मामी यांना पसार होण्यास मदत करेल. तसेच, त्यांकडून पुरावा नाहीसा करण्याचे काम होईल. फिर्यादी यांकडून घेतलेले पैसे आरोपींकडून जप्त करायचे असून त्यांना जामीन दिल्यास ते पैसे लंपास करतील. ते साक्षीदार लोकांवर दबाव आणून त्यांना साक्ष देण्यापासून परावृत्त करतील. कैलास यास जामीन दिल्यास तो औरंगाबद येथे राहत असल्याने न्यायालयात हजर राहणार नाही असा युक्तिवाद अ‍ॅड. अगरवाल यांनी न्यायालयात केला.
Leave A Reply

Your email address will not be published.