मुंबई : मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण, एपीआय सचिन वाझेंच्या सहभाग आणि 100 कोटीचा लेटर बॉम्ब यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच काही मुद्दे उपस्थित केले आहेत.
राज ठाकरे म्हणाले, अतिरेकी बॉम्ब, स्फोटकं ठेवतात हे ऐकले आहे. पण पोलिसच स्फोटकं ठेवतात हे आपण पहिल्यांदाच ऐकत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच ही गोष्ट वाटते तितकी क्षुल्लक नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. या प्रकरणाची केंद्राने चौकशी करावी. ही चौकशी योग्यरित्या झाली नाही तर हा देश अराजकतेकडे जाईल, असा धोक्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी स्फोटकं ठेवण्याचा कट रचण्यात आला ही थेअरी चुकीची असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुकेश अंबानी यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला अंबानी सहकुटुंब उपस्थित होते. आता तेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलीस अंबनी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याचे धाडस करणार नाही. त्यामुळे हे कोणाच्यातरी सांगण्यावरुन झाले असल्याचा संशय राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
राज ठाकरेंनी उपस्थित केले 10 महत्त्वाचे प्रश्न
1. मुकेश अंबानींच्या घराजवळ ठेवण्यात आलेल्या गाडीत जिलेटिन आलं कुठून ?
2. मुकेश अंबानी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध चांगले असताना आणि हि गोष्ट जगजाहिर असताना पोलीस दलातील कोणीही अधिकारी स्फोटकं ठेवण्याची हिंमत करेल का ?
3. मुकेश अंबनी यांच्या घराजवळ चोख बंदोबस्त असतो. एखादी व्यक्ती दोन वेळा तेथून गेली तर चौकशी होते. एक गाडी 24 तास तिथे कशी काय उभी होती ?
4. पोलिस अधिकारी स्फोटकं ठेवत असल्याची घटना गंभीर आहे. यासाठी वरुन आदेश लागतात. ते कोणी दिले ? कोणीतरी सांगितल्या शिवाय वाझे स्फोटकं ठेवण्याची हिंमत करतील का ?
5. अंबानी यांच्या घराजवळ गाडी कशी ठेवली गेली ? ती कुणाच्या सांगण्यावरुन ठेवली गेली ?
6. अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या गाडीत धमकीचे पत्र सापडले, यामध्ये निता भाभी, मुकेश भैय्या असा उल्लेख होता. धमकी देणाऱ्याला कधी कोणी आदर देतं का ?
7. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना आयुक्त पदावरून का हटवण्यात आलं ? यामागचे कारण सरकार कधी सांगणार ?
8. परमबीर सिंग यांचा या कटात सहभाग होता, तर मग त्यांची चौकशी का केली नाही ? त्यांच्या बदलीने काय साध्य होणार ?
9. गृहमंत्री अनिल देशमुखांनी एकट्या वाझेंना 100 कोटी गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. हे एकट्या मुंबईचं झालं. राज्यात एकूण शहरे किती ? तिथले आयुक्त किती ? त्यांचे टार्गेट किती ?
10. मुकेश अंबानी यांच्याकडून पैसे काढणे इतकं सोपं आहे का ? त्यांच्या सुरक्षेत इस्त्रायली लोक तैनात असतात, मध्य प्रदेश पोलिसांचं त्यांना संरक्षण असताना असं धाडस कोण करेल ?