पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील जाहीर सभा होणार की नाही याबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. अखेर या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांची 22 मे रोजी सभा होणार असून ही सभा गणेश कला क्रीडा मंचमध्ये रविवारी सकाळी दहा वाजता होणार असल्याचे सांगितले. दरम्यान, राज ठाकरे यांची 21 मे रोजी मुठा नदी पात्रातील मैदानावर होणार होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या सभेसंदर्भात राज ठाकरे यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबत बैठक घेतली. बाळा नांदगावकर म्हणाले, नदीपात्रात सभा होणार असल्याचं निश्चित झालं होतं. हवामान खात्याचा अंदाज पाहता पाऊस कधीही येऊ शकतो. अशा परिस्थितीत अचानक पाऊस आला तर हजारो लोकांना त्रास होईल. यामुळे 21 मे ऐवजी 22 मे रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी दहा वाजता सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे.
राज ठाकरे यांना अनेक विषयांवर बोलायचे आहे. त्यामुळे त्यांनी ही सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले असताना प्रकृती बिघडल्याने ते पुन्हा मुंबईला परतले. याबाबत बोलताना नांदगावकर यांनी सांगितले की, राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत आहे. ती पुन्हा आता त्रास देत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे. यावर बोलताना नांदगावकर म्हणाले, अयोध्या दौऱ्यावर आम्ही ठाम आहोत. दौरा रद्द केल्याचा निर्णय घेतलेला नाही.
दरम्यान अयोध्या दौऱ्यासाठी मनसेच्या बाजूने मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधून मनसे कार्यकर्ते अयोध्येला पाठवण्याची तयारी सुरु आहे. यासाठी 11 गाड्यांचे बुकिंग करण्यात येत आहे. राज ठाकरे अयोध्येला पोहचण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते अयोध्येत पोहचणार आहेत.