पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे. मात्र ही सभा पुण्यात केव्हा आणि कुठे होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आता या बाबत खुद्द पोलीस प्रशासनानेच स्पष्टीकरण दिले आहे. येत्या शनिवारी म्हणजेच 21 मे रोजी ही सभा होणार आहे. डेक्कन परिसरातील भिडे पुलाजवळ असणाऱ्या नदीपात्रात सभा होणार आहे. सभेच्या परवानगीसाठी सभेच्या मागणीचे पत्र शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांना पाठवले आहे.
या पत्रात 21 मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार असून त्यासाठी योग्य त्या परवानग्या द्या अशी विनंती मनसे पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांना करण्यात आली आहे.
मागच्या तीन सभेत राज ठाकरेंनी मशिदी वरच्या भोंग्यावरून राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. त्यानंतर मनसेने राज्यभर आंदोलन देखील केलं. या आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत राज ठाकरे काय बोलणार आणि आपल्या सभेतून विरोधकांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
त्यातच पुणे शहरातला मनसेत मोठी नाराजी दिसून येत आहे. मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे वारंवार इतर पदाधिकाऱ्यांवर मला डावलले जात असल्याचा आरोप करत आहेत. त्याच पार्श्भूमीवर आजपासून राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यानंतर 31 मे रोजी होणाऱ्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.