मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्याची माहिती खुद्द राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन दिली आहे. राज यांची तब्येत ठीक नसल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
”15 जूनला आदित्य ठाकरेंचा दौरा, त्याची तयारी सुरू आहे, ते इस्कॉनच्या मंदिरालाही भेट देणार आहेत. इस्कॉन व्यवस्थापनाने त्यांना निमंत्रण दिलं आहे. तसेच अयोध्येतल्या प्रमुख लोकांना ते भेटणार आहेत. इतर पक्षाचे कार्यक्रमही अयोध्येत होते, मला माध्यमांकडून कळलं की त्यांनी ते रद्द केले, 5 जूनचे कार्यक्रम. पण 5 जूनच्या कार्यक्रमासाठी काही सहकार्य हवं असतं तर आम्ही त्यांना केलं असतं. अयोध्येत शिवसेनेचं नेहमीच स्वागत केलेलं आहे, तिथे शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग असल्याचंही,” संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरेंच्या अडचणी मला माहित नाही. भाजपाने असं त्यांच्या बाबतीत का करावं ? भाजपा नेहमीच महाराष्ट्रातल्या नेत्यांना त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी वापरून घेते. पण यातून काही जणांना शहाणपण यावं. यातून राज्याच्या नेतृत्वाचं नुकसान होतं. आपण वापरले जातोय हे काहींना उशिरा समजते.” असं ते म्हणाले.