नवी दिल्ली : बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये (Rakesh Jhunjhunwala Portfolio) समाविष्ट असलेल्या शेअर्स (Shares) म्हणजेच समभागांच्या मूल्यामध्ये या वर्षी सप्टेंबर महिन्यात मोठी वाढ झाली आहे. टाटा मोटर्स (Tata Motors) आणि टायटन कंपनी (Titan Company) त्यापैकीच एक आहे. गेल्या एका महिन्यात टाटा मोटर्सच्या शेअर्सची किंमत सुमारे 13 टक्के वाढली. टायटन कंपनीच्या शेअर्सचे दरही या कालावधीत 11.40 टक्क्यांनी वधारले. या दोन्ही शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती या महिन्यात जवळपास 893 कोटींनी वाढली.
एप्रिल ते जून 2021 या तिमाहीसाठी टाटा मोटर्सच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, झुनझुनवाला यांच्याकडे (Big Bull) 3,77,50,000 शेअर्स आहेत. सप्टेंबर 2021मध्ये टाटा मोटर्सच्या शेअर प्राइज हिस्ट्रीनुसार हा ऑटो स्टॉक एनएसईवर (NSE) 287.30 रुपयांनी वाढून 331 रुपये प्रति इक्विटी शेअर झाला. प्रति शेअर 43.70 रुपयांची निव्वळ वाढ दिसून आली. या कालावधीत राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर 2021मध्ये टाटा मोटर्सच्या शेअर होल्डिंगमधून 164.9675 कोटी रुपये कमावले.
एप्रिल ते जून 2021 या तिमाहीसाठी टायटन कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी टाटा समूहाच्या (Tata Group) या कंपनीत गुंतवणूक केली. टायटन कंपनीत राकेश झुनझुनवाला यांचे 3,30,10,395 शेअर्स आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 96,40,575 शेअर्स आहेत. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीकडे मिळून टायटनचे 4,26,50,970 शेअर्स आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये टायटनच्या शेअर्सचा भाव 1921.60 रुपये प्रतिशेअरने वाढून 2092.50 वर पोहोचला. या कालावधीत 170.90 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे राकेश झुनझुनवाला यांनी या शेअर्समधून 728.90 कोटी रुपये कमावले.
टाटा समूहाच्या या दोन शेअर्समुळे राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सप्टेंबर 2021 मध्ये 8938725773 म्हणजेच 893.87 कोटींनी (728.90 +164.97 रुपये) वाढली आहे. झुनझुनवाला यांनी स्वतःच्या आणि पत्नी रेखा यांच्या नावे गुंतवणूक केली आहे. ते चार्टर्ड अकाउंटंट असून, रेअर एंटरप्राइजेस या अॅसेट फर्मचं व्यवस्थापनही बघतात. ट्रेंडलाइनं दिलेल्या माहितीनुसार, राकेश झुनझुनवाला अँड असोसिएट्सकडे सार्वजनिक क्षेत्रातले 38 स्टॉक (Stocks) असून, त्यांची एकूण संपत्ती 21,897 कोटींपेक्षा अधिक आहे