मुंबई : आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा आरोप असून त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार होती. मात्र व्यस्त कामकाजामुळे आज ही सुनावणी घेता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले. ही सुनावणी उद्या होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
राणा दाम्पत्याच्या वकिलांनी याचिकाकर्ते हे प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी असून त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी जामीन अर्जावर आज सुनावणी व्हावी अशी विनंती न्यायालयाला केली होती. मात्र, आजच्या वेळापत्रकानुसार इतर महत्त्वाची प्रकरणे असल्याने राणा दाम्पत्याच्या अर्जावर सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला.
न्यायाधीश राहुल रोकडे यांनी न्यायालयाकडे आज जराही वेळ नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राणा दाम्पत्याला जामिनासाठी अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर ‘हनुमान चालीसा पठण’ करणार असल्याचे आव्हान दिले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. हजारो शिवसैनिक मातोश्री बाहेर जमले होते. इतकंच नाही तर मुंबईत ज्या ठिकाणी राणा दाम्पत्य थांबले होते त्या ठिकाणीही शिवसैनिकांनी जाण्याचा प्रयत्न केला. राणांच्या घोषणेनंतर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटले. अखेर राणांनी आपली घोषणा मागे घेतली, पण त्यानंतर राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. सध्या खासदार नवनीत राणा भायखळा, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.