पवार यांच्या जिल्ह्यात देखिल माथाडी कामगारांवर खंडणीचे गुन्हे दाखल : नरेंद्र पाटील

राज्यातील माथाडींच्या प्रश्नांबाबत आता आझाद मैदानात आंदोलन

0

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सरकार मधिल मंत्री, पालकमंत्री आणि कामगार आयुक्त, पोलिस आयुक्त हे माथाडी कामगारांवर अन्याय करुन कंपनी व्यवस्थापनाला आणि ठेकेदाराला अनुकूल भुमिका घेत आहेत. माथाडी चळवळी विषयी सर्व माहिती असणारे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात देखिल माथीडींचे हक्क डावलून त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले जात आहेत याच्या निषेधार्थ आणि महाविकास आघाडीचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी आणि बुधवारी (दि. १५ व १६ मार्च) मुंबईत आझाद मैदानावर दोन दिवसांचे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिला.

माजी आमदार नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. ११ मार्च) वाकडेवाडी, पुणे – मुंबई महामार्ग येथिल अप्पर कामगार आयुक्त कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी चिंचवड केएसबी चौकातील स्व. आमदार आण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला सुरुवात झाली. मुंबई – पुणे महामार्गाने मोर्चा वाकडेवाडी येथिल अप्पर कामगार आयुक्तालय येथे नेण्यात आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने अप्पर कामगार आयुक्तांना निवेदन दिले.

या निवदेनात पुढे म्हटले आहे की, मागील नऊ महिन्यांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमधिल माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत कामगार आयुक्त, उप आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. परंतू महाविकास आघाडी सरकारला जाग येत नाही. कामगार आयुक्तालयातील कर्मचारी, अधिकारी कंपनी व्यवस्थापनाचे दलाल असल्यासारखे काम करीत आहेत.  महाराष्ट्र शासनाच्या पुणे माथाडी, हमाल व इतर श्रमजिवी कामगार मंडळ आणि पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये कामे करणा-या माथाडी कामगारांचे न्याय प्रश्न सोडविण्यास सतत दिरंगाई होत आहे.

पुणे येथे माथाडी कामगारांसाठी टोळी पध्दत लागू करण्याकरीता तत्कालिन अप्पर कामगार आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालानुसार कार्यवाही व्हावी. गुलटेकडी येथिल छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील पालावाला महिला कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळाले पाहिजे. तसेच मार्केटमध्ये अनोंदीत डमी कामगार कामे करीत आहेत, त्यांच्यावर माथाडी मंडळाकडून कारवाई झाली पाहिजे. मे.उत्तरा फिडस प्रा.लिमिटेड, केतकावळे, जिल्हा-पुणे येथे काम करणा-या पुणे माथाडी बोर्डातील टोळी नं.१३५० मधील माथाडी कामगारांना त्यांचे हक्काचे काम मिळवून द्यावे आणि माथाडी मंडळाने बेकायदेशिररित्या नोंदी केलेल्या कामगारांची नोंदणी रद्द करावी.

शेतक-यांच्या पट्टीतून व्यापारी तोलाई कपात करतात परंतु सदरील कपात केलेली तोलाईची रक्कम काही व्यापारी माथाडी मंडळात भरणा करीत नाहीत. अशा व्यापा-यांवर माथाडी मंडळाकडून कारवाई झाली पाहिजे. मे.टाटा मोटर्स लिमिटेड, पुणे येथिल पिंपरी चिंचवड माथाडी मंडळाच्या टोळी नं. ४९५ मधील माथाडी कामगारांचे प्रलंबित ताबडतोब सोडवा. मे महिंद्रा लॉजिस्टिक, निघोज, चाकण येथिल पिंपरी चिंचवड माथाडी बोर्डाच्या टोळी नं. ६७७ मधील माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणुक करणे, पिंपरी चिंचवड माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांना नोंदणी, भविष्य निर्वाह निधीतून उचल, इन्शुरन्स व मंडळाकडून इतर मिळणा-या सर्व सेवा सुविधा यांची विहित कालावधीत मंडळाकडून पुर्तता करा.  बहुतांश कंपन्यांमध्ये फक्त नावापुरती माथाडी कामगारांची नोंदणी केली जाते. या कंपन्यांमध्ये अनोंदीत कामगारच माथाडींची कामे करीत असतात, या अनोंदीत कामगारांना व कंपन्यांना ठेकेदार व गुंडांकडून संरक्षण दिले जाते, त्यामुळे माथाडी कायद्याची पायमल्ली होत आहे, अशा कंपनीमध्ये मंडळामार्फत भेट शेरे पारित करुन तेथिल संपुर्ण कामगारांची माथाडी मंडळात नोंदणी करणे, पुणे व पिंपरी चिंचवड माथाडी मंडळामार्फत माथाडी कामगारांच्या पगारातून दोन टक्के प्रमाणे कपात केला जाणारा टी.डी.एस. त्वरीत बंद करणे या प्रश्नांची सोडवणुक अप्पर कामगार आयुक्त आणि पुणे व पिंपरी चिंचवड माथाडी मंडळाकडून होत नाही. पुणे व पिंपरी चिंचवड माथाडी मंडळातील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबद्दल अनेकवेळा निवेदने सादर केली, संयुक्त बैठका आयोजित केल्या, मात्र न्याय्य प्रश्नांची सोडवणुक होण्यास जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे माथाडी कामगारांचे मंगळवारी आणि बुधवारी (दि. १५ व १६ मार्च) मुंबईत आझाद मैदानावर दोन दिवसांचे आंदोलन करण्यात येणार आहे असेही यावेळी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.