पिंपरी : लग्न झाले असताना दुसऱ्या महिलेस स्वतःच्या जाळ्यात ओढून, पहिल्या पत्नीला घटस्फोट देतो असे सांगून महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून हा सहायक पोलिस निरीक्षक सातारा पोलीस दलात कार्यरत आहे. सध्या तो मुख्यालयात आहे. या प्रकरणी पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी बबन भोसले याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पिंपळे गुरव येथे 28 फेब्रुवारी ते 15 जून दरम्यान घडला.
सांगवी पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार; भोसले यांनी पीडित महिलेसोबत गधंर्व पद्धतीने विवाह केला. त्यानंतर पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तुला नांदवतो असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तिला बदनामीची धमकी देऊन मारहाण केली. तपास सांगवी पोलीस करत आहेत.
संबंधित महिला पुणे शहरात राहत होती. त्यावेळी त्या महिलेचा नवरा त्रास देत असल्याने ती पोलीस ठाण्यात गेली. तिने नवऱ्या विरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीचा तपास दरम्यान भोसले आणि त्या महिलेची ओळख झाली. या ओळखीतून त्यांचे रिलेशन वाढले आणि दोघांनी गधंर्व पद्धतीने लग्न केले. काही दिवस पीडित महिला सातारा येथे राहत होती.