पुणे : हेल्पर म्हणून काम करणा-या महिला सहका-यावर तिच्या मासिक पाळीदरम्यान बलात्कार करणाऱ्या परप्रांतीय सुपरवायझरला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि १४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. आर. पुरवार यांनी हा निकाल दिला.
गोविंदसिंग (३१, रा. उत्तरप्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. विवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणात महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी शिक्रापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. १० मे २०१५ रोजी शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आरोपी आणि पीडित एकाच कंपनीत काम करत असून, कंपनीच्या खोलीमध्ये ते राहतात. मासिक पाळी आल्याने पोटात दुखू लागल्याने पीडित कामाला गेली नव्हती. घटनेच्या दिवशी गोविंद सिंग हा रोटी मागण्याच्या बहाण्याने संबंधित विवाहितेच्या घरी गेला. तिने कालची रोटी आहे, चालेल का, असे विचारले. तो, हो म्हणाला. ती रोटी देत असताना, तो घरात शिरला.
दरवाजाला कडी लावून धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करत बलात्कार आणि इतर कलमानुसार न्यायालयाने शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील ऍड. एन. डी. पाटील आणि सहायक जिल्हा सरकारी वकील ऍड. राजेश कावेडीया यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले.
पीडितेचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते : बचावपक्ष
पीडितेचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध असल्याचा बचाव आरोपीच्या वकिलांनी घेतला. मात्र, मासिक पाळीत तिच्यावर बलात्कार केल्याच्या कृत्यातून आरोपीची विकृती दिसून येत आहे. प्रेमसंबंध असो अथवा नसो तिच्या संमतीशिवाय संबंध ठेवता येत नाहीत. हा त्याने तिच्यावर केलेला बलात्कारच आहे. त्याला शिक्षा देण्याचा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला.