राऊतांची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बॉम्ब : दरेकर

योग्य वेळी उत्तर देऊ : फडणवीस

0

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून खासदार संजय राऊत यांच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेची राज्यभर चर्चा होती. अखेर ती आज झाली. राऊतांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, त्यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रविण दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बॉम्ब होता, अश्या शब्दात त्यांच्या पत्रकार परिषदेची खिल्ली उडवली आहे.

राऊतांनी भाजपच्या साडे-तीन नेत्यांना आत टाकणार असे विधान केल्याने राज्यभर त्यांच्या या विधानाची चर्चा होती. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत राऊत काय गौप्यस्फोट करणार आणि त्यांनी उल्लेख केलेले कोण ते साडेतीन नेते आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राऊतांनी पत्रकारपरिषदेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, सुधीर मुनगंटीवार यांच्यावर थेट हल्ला चढवला. तर ईडीच्या अधिकाऱ्यांना देखील सुनावले आहे. यानंतर भाजप नेत्यांनी राऊतांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे.


दरेकर म्हणाले, संजय राऊत हे आज आपल्या पत्रकार परिषदेत साडे-तीन नेत्यांची नावे सांगणार होते. मात्र, त्यांनी ती सांगितले नाहीत. राऊतांची पत्रकार परिषद ही फुसका बॉम्ब होती त्यापेक्षा आपटी बॉम्ब तरी बरा असतो, अश्या शब्दात त्यांनी राऊतांच्या पत्रकार परिषदेवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर देतांना योग्यवेळी उत्तर देवू, असे एका ओळीत उत्तर दिले. तर सुधीर मु्नगंटीवार यांनी राऊतांनी केलेल्या आरोपांवर ते सिद्ध करून दाखवा व चौकशी करा, असे त्यांना आव्हान दिले आहे.


दरम्यान, राऊतांनी भाजपवर हल्लाबोल करतांना चौफेर फटकेबाजी केली. ते म्हणाले, फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रात 25 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. तसेच महाआयटीमध्ये ५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला.

फडणविसांच्या काळातील ५ हजार कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब माझ्याकडे आहेत. ते सगळे कागदपत्र घेवून आधी EOW कडे तक्रार करणार आणि नंतर हे प्रकरण ईडीकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला. मराठी भाषेच्या विरोधात कोर्टात सोमय्या गेले होते आणि हे यांचे नेता आहे, असे भाजपला सुनावले.

राऊत म्हणाले, PMC बॅंक घोटाळ्यातील पैसे मी वापरत असल्याचा सोमय्या सांगतात. पण त्यातील राकेश वाधवानने वीस कोटी रुपये भाजपच्या अकौंटमध्ये गेले आहेत. निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कोणाची कंपनी आहे? ही सोमय्यांची कंपनी आहे.

PMC घोटाळ्यातील आरोपी वाधवान याला ब्लॅकमेल करून सोमय्यांनी ८० ते १०० कोटी रुपयांची रोकड घेतली, असा आरोपही त्यांनी केला. तसेच, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटिवार यांच्या मुलीच्या लग्नातील सेटची किंमत साडेनऊ कोटी रुपये सांगत राऊतांनी मुनगंटीवार यांनाही डिवचले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.