पिंपरी : शहरातील रावण टोळीचा सदस्य असणाऱ्या आणि मोक्का कारवाई अंतर्गत फरार असणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या गुंडा विरोधी पथकाने आवळल्या आहेत. यापूर्वी मोक्का मधील आणखी दोन गुन्हेगार अटक केले आहेत.
रूपेश प्रकाश आखाडे (24, रा. त्रिवेणीनगर, निगडी) याला अटक केली आहे. रुपेश हा पुण्यातील वारजे परिसरात फिरत असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकास मिळाली. यावरुन गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक हरिष माने आणि त्यांच्या पथकाने वारजे परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
रुपेश याच्यावर खून, दरोडा, मारामारी अश्या प्रकारचे तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. मात्र तो फरार होता. तो रावण टोळीतील ऍक्टिव्ह सदस्य आहे. गुंडा विरोधी पथकाने यापूर्वी दोन सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने केली आहे.