250 आलिशान वाहनांची परस्पर विक्री; माजी सरपंचाला अटक

0

पिंपरी : गावचा माजी सरपंच असल्याने परिसरात एक विश्वास होता. मात्र या विश्वासाचा गैरफायदा घेत अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नमाझी कंपन्यांमध्ये ओळख आहे. तुम्ही गाडी विकत घ्या, मी ती कंपनीत लावतो, असे सांगून नागरिकांना महागड्या गाड्या घेण्यास भाग पाडले. त्यानंतर भाड्याने घेतलेल्या सुमारे 250 गाड्यांची परस्पर विक्री केली. या प्रकरणी खेड तालुक्‍यातील माजी सरपंचाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोटी 96 लाख रुपये किंमतीच्या 20 महागड्या गाड्या हस्तगत केल्या आहेत.

सागर मोहन साबळे (34, रा. साबळेवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो साबळेवाडीचा 2014 मध्ये सरपंच होता.

माझी कंपन्यांमध्ये ओळख आहे. तुम्ही गाडी विकत घ्या. ती मी भाड्याने लावतो, असे सांगून सरपंच नागरिकांना गाडी घेण्यास भाग पाडत असे. ती गाडी भाड्याने घेतल्यावर काही महिने त्यांना भाडे देत असे. त्यानंतर त्या गाड्यांची इतर जिल्ह्यात जाऊन नागरिकांकडे गहाण ठेवत असे.

ज्याची गाडी आहे तो जुगारात हरला आहे. तो कर्जबाजारी झाल्याने त्याने माझ्याकडे गाडी गहाण ठेवली आहे. आता तो गाडी सोडवून नेईल, असे वाटत नाही. त्यामुळे ती गाडी तुमच्याकडे गहाण ठेवा, असे सांगून तो इतर जिल्ह्यातील नागरिकांना महागडी गाडी देत असे. आलेल्या पैशातून मौजमजा करीत असे. आत्तापर्यंत त्याने खेड तालुक्‍यातील 55 जण, दौंड-बारामती येथील 20, पिंपरी चिंचवड शहरातील 70 आणि इतर ठिकाणचे नागरिक असे एकूण 200 ते 250 जणांची फसवणूक केली आहे.

आरोपीबाबत पोलीस आयुक्‍तांकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी भोसरी पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी बीड येथे जाऊन आरोपीला अटक केली. त्याच्याकडून एक कोटी 96 लाखांच्या 20 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. इतर ठिकाणीही गुन्हे दाखल असून आरोपींकडून इतर वाहने जप्त करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.