मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप करणारे मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह तसेच अप्पर पोलिस अधीक्षक पराग मणेरे यांना सेवेतून निलंबित करण्यात आलेय. त्याचबरोबर 5 पोलीस उपायुक्त आणि 5 सहाय्यक आयुक्त पदावर असणा-या पोलीस अधिकाऱ्यांच्या अशा एकूण 10 जणांच्या निलंबनाची शिफारासही करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
महाराष्ट्रातील विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या दरम्यान काल (बुधवारी) सभागृहात लेखी प्रश्नोत्तरात गृहमंत्री वळसे- पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. परमबीर सिंह यांच्यासह इतर पोलिसांना निलंबित करण्याच्या प्रस्तावाबाबत अबू आझमी यांनी तारांकित सवाल उपस्थित केला होता. त्यावर परमबीर आणि 29 पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा एकूण 30 जणांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, या गुन्ह्यांचा निःपक्षपातीपणे तपास करण्यासाठी त्यांना पोलीस सेवेत ठेवणे योग्य होणार नसल्याचे म्हणत त्यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्याची शिफारस सरकारकडे केली होती. यात 5 उपायुक्त तसेच 5 सहाय्यक आयुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.