मुंबई ः विविध राज्यांमध्ये करोना लसीकरणाची युद्धपातळीवर तयार सुरू झाली. केंद्रानेदेखील लसीकरणाबाबत मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे. या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ”लस देण्यासाठी पद्धत्ती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्यासंबंधीचा मॅसेज संबंधित व्यक्तीला येईल, त्यानंतर व्यक्ती लसीकरण केंद्रावर आल्यानंतर ओळख पटवली जाईल. त्यानंतर त्या व्यक्तीला लस दिली जाईल”, अशी माहिती टोपे यांनी दिली.
राजेश टोपे पुढे म्हणाले की, ”लसीकरणाबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक आणि इतर आजार असलेले नागरिक यांची माहिती गोळा केली जात आहे. १८ हजार लोकांना प्रशिक्षण देण्याचं काम पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे.”
”करोना प्रतिबंध लस केंद्र सरकार पुरवेल, अशी आम्हाला खात्री आहे. जी कामं राज्य सरकारने करायची आहेत, ती आम्ही करतो आहोत. लाॅजिस्टिक, डेटा ही सर्व कामं सुरू आहेत. लसीकरणाबाबत एक युनीट तयार करण्यात आलं आहे. सीरम आणि भारत बायोटेक यांनी लसीकरणीबाबत केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. आता सरकारला निर्णय घ्यायचा आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी घेतली आहे.