अंधेरी येथील डान्स बार मध्ये रिमोट कंट्रोल भुयारी मार्ग

पोलिसांचा छापा; 15 तास झाडाझडती

0

मुंबई: मुंबईतील अंधेरी येथे एका डान्स बारमध्ये पोलिसांची रेड पडल्यावर बाहेर जाण्यासाठी एक भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे. याचे ऑपरेटिंग रिमोट कंट्रोल वर केले जाते. पोलिसांनी छापा टाकून १७ बार गर्लची सुटका केली. डान्स बारमध्ये तयार केलेल्या मेकअप रूमच्या आतील सीक्रेट रूममध्ये या तरूणींना लपवण्यात आले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी या पोलिसांना तब्बल १५ तास झडती घ्यावी लागली.

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांना एका स्वयंसेवी संस्थेकडून माहिती मिळाली होती. या बारमध्ये कोविड १९ नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून, या बारमध्ये खूप गर्दी होते. या बारमध्ये येणारे ग्राहक दिवसाला लाखो रुपये उधळतात, अशी तक्रार मिळाली होती. बारमध्ये तरूणी नाचत असून, ते बार संपूर्ण रात्रभर खुले असते. स्थानिक पोलिसांना याबाबत काहीही माहिती नाही, अशी तक्रार मिळाल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी बारवर छापा मारला.
पोलिसांनी छापा मारला असता, बारमध्ये एकही तरूणी दिसून आली नाही. त्यानंतर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी बाथरूम, स्टोरेज रूम, किचन आणि अन्य ठिकाणी त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांना तरूणी आढळून आल्या नाहीत. बरेच तास पोलीस बारमधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी करत होते. मात्र, त्यांनीही बारमध्ये तरूणी नसल्याचे सांगितले. सकाळ होताच समाज सेवा शाखेचे डीसीपी घटनास्थळी पोहोचले. रविवारी सकाळी पुन्हा झडती घेण्यास सुरुवात केली. मेकअप रूममध्ये पोलिसांना एका आरसा संशयास्पदरित्या लावलेला दिसून आला. पोलिसांनी हातोड्याने आरसा तोडण्यास सुरुवात केली. आरशामागे एक दरवाजा दिसून आला. तो दरवाजा रिमोटच्या मदतीने उघडला जात होता. पोलिसांनी तो दरवाजा उघडला. जवळपास तीन फूट रुंद असलेल्या या सीक्रेट रूममध्ये १७ तरूणी आढळून आल्या. या प्रकरणी २० जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, बार सील केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.