पुणे : एका २५ वर्षीय तरुणीची बसमध्ये ओळख झाल्यानंतर तिला पुन्हा भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणाने शीतपेयमधून तरुणीस गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचे विवस्त्र फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून १७ लाख रुपये घेऊन तिची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.
याबाबत पीडित तरुणीने तक्रार केल्यानंतर आरोपी फहीम नईम सय्यद (वय ३३) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी व आरोपी फहीम सय्यद यांची बसमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर तरुणी ही पुस्तक खरेदी करण्यासाठी पुणे शहरात आलेली होती. त्यावेळी आरोपी तिला भेटला व त्याने शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन तरुणीस एका लाॅजवर नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरिक संबंध केले. त्यानंतर तिचे विवस्थ अवस्थेतील फोटो, व्हिडिओ काढून त्याने ते सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून सुमारे १७ लाख रुपये जबरदस्तीने घेतले. अशाप्रकारे सतत पैशाची मागणी आरोपी करत असल्याने अखेर नेहमीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलीसांकडे धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
आरोपीने तिला त्याचे लग्न न झाल्याचे, स्वतःचा व्यवसाय असल्याचे खोटे सांगितल्याची बाब ही उघडकीस आली आहे. याबाबत पुढील तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. अहिवळे करत आहे.