मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार राज्यातील निर्बंध उठवण्याच्या प्रयत्नात असल्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भात आणि मुंबई लोकल बाबत या विषयावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांतील निर्बंध लवकरच उठवण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संकेत दिले आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे.
बैठकीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली यावर भाष्य करताना राजेश टोपे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील 25 जिल्हे ज्यांचा रुग्णवाढीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे, अशा जिल्ह्यांमधील निर्बंध उठवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. स्तर 3 चे जे निर्बंध होते, त्यात आता शनिवार आणि रविवारी दुकाने बंद ठेवण्यास सांगितले होते. आता, मात्र, केवळ रविवारी दुकाने बंद ठेवून शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत दुकान उघडण्यास मुभा दिली जावी, याविषयावर सकारात्मक चर्चा झाली असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे.
पुढं बोलताना टोपे म्हणाले की, ‘कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही अधिक असणाऱ्या 11 जिल्ह्यांना स्तर 3 मध्येच ठेवण्यात येईल. यात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कोकणातील 4 जिल्हे आणि मराठवाड्यातील बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहतील. हे जिल्हे वगळून राज्यातील अन्य 25 जिल्ह्यांमधील निर्बंध लवकरच उठवले जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे. तसेच येत्या एक ते दोन दिवसात याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.