पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणावरुन राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली. यानंतर आता आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीचा तत्कालीन मॅनेजर अश्विन कुमार आणि परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरे या दोघांना ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींवर उमेदवारांचे निकाल बदलने, प्रश्नपत्रिकेत फेरफार करणे, असे आरोप आहेत.
या आरोपींनी तब्बल 500 उमेदवारांचे निकाल बदलले आहेत. त्यासाठी त्यांनी 5 कोटींचा व्यवहार केला असल्याची शक्यता समोर येत आहे. सैन्य भरती, म्हाडा, टीईटी या परीक्षांत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात मोठं रॅकेट असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी ज्या आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून मिळाली आहे.
दरम्यान, या आगोदर तुकाराम सुपे यांच्याकडून सुरुवातीला 90 लाखांचं तर नंतर 2 कोटींचं घबाड पोलिसांनी जप्त केलं होतं. यांनतर आज (मंगळवारी) या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केलीय. याबाबत माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.