मुंबई: कोरोनामुळे गेली दिड दोन वर्षे सुरु असलेल्या वेगवेगळ्या नियमातून सरकारने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर सुटका केली आहे. राज्यात कोविड संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना अनलॉकच्या दिशेने सर्वात मोठं पाऊल टाकण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत झालेली चर्चा आणि कोविड टास्क फोर्सच्या शिफारशींच्या आधारे ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित आदेश जारी करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुटे यांच्या स्वाक्षरीने ब्रेक द चेनचा सुधारित आदेश जारी झाला आहे. त्यात मुंबई उपनगरीय लोकल, उपहारगृहे, दुकाने, शॉपिंग मॉल्स, जीम्नॅशियम, योगा सेंटर्स, सलून, स्पा, इनडोअर स्पोर्ट्स, कार्यालये, औद्योगिक आणि सेवाविषयक आस्थापना, विवाह सोहळे याबाबत मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचवेळी राज्यात सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील) पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील धार्मिक स्थळेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– कोविड वरील लसचे दोन्ही डोस घेणाऱ्या सर्व प्रवाशांना ओळखपत्राच्या आधारे लोकल प्रवासासाठी मासिक व त्रैमासिक पास देण्यात यावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले असून रेल्वे तिकीट तपासनीस याला ओळखपत्र तपासण्याचा अधिकार असेल. ओळखपत्र खोटे असल्यास ५०० रुपये इतका दंड आणि कायदेशीर कारवाई करण्याची मुभा असेल.
– खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा. पार्सल सेवा २४ तास सुरू ठेवता येईल.
– राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवू शकतात. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक.
– राज्यात सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा. शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक. लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक.
– वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा. सदर ठिकाणी एसी असल्यास, वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील.
– इनडोअर स्पोर्ट्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच, या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरू करण्याची मुभा.
– ज्या खासगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा.
– सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे ज्या आस्थापना वरील कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी. कर्मचाऱ्यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे. खासगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये २४ तास सूरू ठेवण्याची मुभा. मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.
– राज्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाटया, समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरू राहतील.
विवाह सोहळ्यांसाठी ही बंधने
अ) खुल्या प्रांगणातील वा लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरू ठेवण्याची मुभा.
ब) खुल्या प्रांगण वा लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल.
क) बंदिस्त मंगल कार्यालय वा हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादित असेल.
कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक राहिल. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल वा कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल वा मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन, बँडपथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधित सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.