पुणे : श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शाहू महाराज भोसले यांचं निधन आज, मंगळवारी पुण्यात झाले. रुग्णालयात उपचारामादम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाने साताऱ्यात शोककळा पसरली आहे.
शांत संयमी सुसंस्कृत व आपल्या साधेपणाने ओळखले जाणारे सातारचे राजे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले त्यांचा जन्म २३ एप्रिल १९४७ साली झाला. साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होतं. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग सहा वर्ष शाहू नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली.
१५ मे १९८५ ते १६ डिसेंबर १९९१ पर्यंत ते शाहू नगरीचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या काळात त्यांनी समाज उपयोगी विविध कामे केली. सातारच्या राजघराण्यातील उदयनराजे व शिवेंद्रसिंह राजे यांचे वैर ज्यावेळेस विकोपाला गेले होते. त्यावेळेस दोघांना एकत्र आणून राजघराण्यातील वैरत्व संपवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला.
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना खेळाविषयी प्रचंड आवड होती. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष होते. तसेच शिक्षण क्षेत्रात ही आरे गावच्या श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर शिवतेज माध्यमिक विद्यालय आरे या संस्थेची उल्लेखनीय कार्य आजपर्यंत चालू आहे, त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.