पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध गुन्ह्यातील आरोपींना जामीन राहून न्यायालयाची फसवणूक केल्या प्रकरणातील आरोपीकडे १० आधारकार्ड व १६ रेशनकार्ड पोलिसांना सापडले आहेत. संबंधित आरोपी हा रिक्षा चालक आहे.
रणजित नरसिंग सूर्यवंशी (वय ३४, रा. बोपोडी) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी त्याची घराची झडती पोलिसांनी घेतली. त्यात त्याकडे १० बनावट आधारकार्ड, १६ बनावट रेशनिंग कार्ड, एका कंपनीच्या नावाने शिक्के असलेल्या पाच पेमेंट स्लीप, दोन ओळखपत्र, एक शिक्का असा मुद्देमाल मिळून आला आहे. पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील जे. के. लक्का यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करत त्याच्या पोलिस कोठडीत एक एप्रिलपर्यंत वाढ केली. या प्रकरणी यापूर्वी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. २२ डिसेंबर २०२० रोजी शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात बनावट जामीनदारांचा प्रकार उघडकीस आला होता.