पुणे : जमिन व्यवहारात फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला न्यायालयाने १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेने त्याला मंगळवारी दुपारी अटक केली होती. बुधवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
बऱ्हाटे याचा मुलगा मयुरेश याची देखील ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीक रवानगी झाली आहे. तर बऱ्हाटेची पत्नी संगिता आणि त्याला मदत करणार वकीलाला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बऱ्हाटे याच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल असून त्यातील तीन गुन्ह्यांत मोक्का कायद्यानुसार कारवार्इ करण्यात आली आहे. हडपसर पोलिस ठाण्यात सुमंत रंगनाथ देठे (वय ५८, रा. मांजरी ग्रीन, मांजरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दाखल केलेल्या गुन्ह्यात सहभाग तसेच कटात सहभागी असल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. संबंधित गुन्ह्यात बऱ्हाटेसह १३ जणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई करण्यात आली. यानंतर बऱ्हाटेच्या मुलीची, जावयाची व इतर नातेवाइकांची देखील चौकशी सुरु करण्यात आली होती.
विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांत अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून बऱ्हाटे अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. मात्र तेथेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे त्याला पुणे पोलिसांनी २३ ऑक्टोंबर २०२० रोजी फरारी घोषित केले आहे. बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्याकडे खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता.