पिंपरी : एका डॉक्टरला त्यांचे आणि त्यांच्या मुलीचे फोटो मॉर्फ करून ते एस्कॉर्ट साईटवर टाकण्याची धमकी देत तिघांनी खंडणी मागितली. खंडणीची काही रक्कम ऑनलाईन माध्यमातून स्वीकारली. याप्रकरणी एका महिलेला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.
श्वेता सिंग (21, रा. हलियापूर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यासह 7700006124 क्रमांकावरील जितेंद्रकुमार, गुगल पे क्रमांक 7992344364 धारक व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 46 वर्षीय डॉक्टरने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सुलेखा डॉट कॉम स्पा अँड ब्युटी सर्व्हिसेस अॅट होम याद्वारे फिर्यादी यांना सर्व्हिस देण्याच्या बहाण्याने रोख रकमेची मागणी केली. धमकी देऊन पैशांची मागणी केली मात्र फिर्यादी पैसे देत नसल्याचे माहिती होताच आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलीचे फोटो न्यूड मॉर्फ केले. ते फोटो एस्कॉर्ट साईटवर पाठवण्याची आरोपींनी धमकी देऊन ते फोटो फिर्यादी यांना व्हाट्सअपला पाठवले. 10 हजार रुपयांची मागणी करून त्यातील चार हजार रुपये आरोपींनी गुगल पे द्वारे स्वीकारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.