मुंबई : भाजपशासित राज्यात निवडणुकीपूर्वी दंगल घडवली जाते, असा आरोप शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला आहे. गुहागर दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागले. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी असा आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
जाधव म्हणाले की, संपूर्ण देशाची परिस्थिती जर बघितली तर ज्या – ज्या राज्यात भाजपची सत्ता आली त्या प्रत्येक राज्यात निवडणूक पूर्व जातीय दंगली झालेल्या आहेत, घडल्या आहेत, घडवलेल्या आहेत. हा इतिहास आहे, तो माझ्या डोळ्यासमोर येतोय, असे म्हणत भास्कर जाधव यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे.
भास्कर जाधव यांनी यापूर्वी विधिमंडळातही भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. ते म्हणाले होते की, महाराष्ट्रात पुन्हा पानिपतची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. या लढाईत शिवसेनेलाच शिवसेनेशी लढवलं जातंय. एकाबाजूला शिवसेनेतून फुटून शिंदे गटाकडे 40 आमदार गेले आहेत, तर दुसरीकडे शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिक छातीचा कोट करून उभा आहे. या लढाईत आता पहिला वार कोण करणार, हे पाहावे लागेल. दिल्लीचे तख्त वाचवण्यासाठी भाजपकडूनच ही लढाई लढवली जात आहे. या टीकेनंतर आता जाधव पुन्हा आक्रमक झालेत.