पिंपरी : शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे . दिवसाला 25 ते 30 जणांचे मृत्यू होत आहे . वाढलेली मृत्यू संख्या चिंताजनक आहे . प्रत्येकाचा जीव महत्वाचा असून मृत्यू रोखण्यासाठी , मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत , अशी सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे .
तसेच शहरामध्ये कोल्ड स्टोरेजची संख्या कमी पडत असून त्यामध्ये वाढ करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे . खासदार बारणे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन पाठविले आहे . शहरातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे . खासदार बारणे यांनी म्हटले आहे की , कोरोनामुळे नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
त्यामुळे महापालिकेच्या विद्युत दाहिनीमध्ये अंत्यविधीसाठी वेळ लागत आहे . याकरीता कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांचा अंत्यविधी करण्यासाठी स्माशानभूमीमध्ये इतर व्यवस्था करू शकतो का ? याबाबत विचार करावा . सध्या शहरामध्ये कोल्ड स्टोरेजची संख्या कमी पडत आहे . अधिकचे स्टोरेजची व्यवस्था करण्याबाबत विचार करण्यात यावा .
शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत . दरररोज तीन हजाराच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत . सध्या महापालिका व खासगी रूग्णालयात रूग्णांना खाटाची उपलब्धता नाही . त्यातच ऑक्सिजन व व्हेंटेलेटरच्या खाटा मर्यादित आहेत . त्यामुळे अधिकच्या खाटा उपलब्ध करून देण्यासाठी महापलिकेने व्यवस्था करावी . तसेच खासगी रूग्णालय ताब्यात घेवून खाटांची संख्या वाढवावी . एकदरीत पिंपरी – चिंचवड शहराची परिस्थिती गंभीर झाली आहे . त्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत . उपाययोजना कराव्यात , अशी सूचना खासदार बारणे यांनी केली आहे .