विदेशी पक्षांचा अधिवास वाढविण्यासाठी नद्यांचे नैसर्गिक पद्धतीने संवर्धन होणार
आमदार जगताप यांच्या सूचनेला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड शहरात थंडी सुरु झाली की, रशिया, मंगोलिया, सायबेरिया, अफगाणिस्तान यांसारख्या देशातून विविध पक्षांचे थवे येतात. हे पक्षी मुळा, इंद्रायणी, पवना नद्यांच्या परिसरात तसेच सुमंत सरोवर, संभाजी नगर, चिखली भागातील खाणींच्या परिसरात उतरतात. या परदेशी पक्षांमुळे परिसरातील निसर्ग सौंदर्यात वाढ होते. पिंपरी-चिंचवड शहरातील नैसर्गिक नदी-नाले, पाणवठे कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे या विदेशी पक्ष्यांचा अधिवास देखील कमी होऊ लागला आहे. त्यांचा अधिवास जतन करून ठेवण्यासाठी पक्षीप्रेमी संस्था, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.नद्या व पाणवठे प्रदूषित होणार नाहीत, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्थसंकल्पीय मागण्यांमध्ये सांगितले होते.
त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना लेखी उत्तर पाठवले आहे. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी स्थानिक प्रशासनाने शहराचा जैवविविधता निर्देशांक काढणे, नागरिक जैवविविधता नोंदवही तयार करणे, अशी कामे हाती घेतली आहेत. विविध स्थलांतरित पक्ष्यांचा नदीकाठचा अधिवास जपून विकासकामे केली जात आहेत. औद्योगिक शहर असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने नागरिक व लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध उद्याने विकसित केली जात आहेत. तसेच नवीन उद्याने विकसित करण्याचे नियोजन आहे. शहरातील पवना, इंद्रायणी, मुठा नदीमधील प्रदूषण कमी करण्यासाठी नदी पुनर्जीवन प्रकल्प प्रस्तावित आहे. पवना व इंद्रायणी नदीत मिसळणारे सांडपाणी गोळा करून जवळच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रियेला पाठवण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूने इंटरसेप्टर सेव्हर लाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
यामुळे घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी नदीपात्रात जाणार नाही. तसेच नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गत नदीचे नैसर्गिक पद्धतीने संवर्धन करण्याचा प्रकल्प देखील शासनाच्या विचाराधीन असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी आमदार जगताप यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.