पेट्रोल पंप लुटण्याचा तयारीत असलेले दरोडेखोर गजाआड

0

पिंपरी : पेट्रोल पंपावर शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना हिंजवडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. ही कारवाई पोलिसांनी आज (दि.8) पहाटे दोन ते चार या कालावधीत माण, हिंजवडी येथे केली आहे.

या कारवाईत पोलिसांनी अनिकेत उर्फ मोन्या अनिल शिंदे (20, रा.मुळशी), अविनाश घनश्याम पवार (30, रा.वाकड), इस्माईल करीम शेख (20, रा.पुनावळे), रामेश्वर साहेबराव तोगरे (20, रा.थेरगाव), सुरज निरंजन पवार (21, रा.वाकड) अशा पाच आरोपींना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, घोटावडे माण रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत काही जण असल्याची पक्की खबर मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस घटनास्थळी गेले. तेथे आरोपींकडे शस्त्र असल्याने पोलिसांनी त्यांच्या गाड्या काही अतरांवर लावल्या व परिसराची पाहणी केली असता पाच संशयीत इसम हे माण येथील बाबुजी बुवा मंदिराच्या आडोश्याला अंधारात दबा धरून बसले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना घेरले व मोठ्या शिताफीने आरोपींना शस्त्रासह ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 2 गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतूस, 1 लोखंडी पालघन, 1 लोखंडी कोयता, मिरची पूड, 4 मोबाईल असा एकूण 1 लाख 28 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता आरोपी हे हिंजवडी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ते फरार होते. ते आत्तापर्यंत लपून परिसरात वावरत होते.

यातील अनिकेत शिंदे याच्यावर हिंजवडी व वाकड पोलीस ठाण्यात दरोडा व खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून हिंजवडीतील दरोड्याच्या गुन्ह्यात इस्माईल करीम शेख व रामेश्वर तोगरे यांनीही त्याला साथ दिली होती. आरोपींवर दरोड्याचा प्रयत्न व बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला असून हिंजवडी पोलीस याचा पुढिल तपास करत आहेत.

हि कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर, गुन्हे पोलीस निरीक्षक सुनिल दहिफळे व सोन्या बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पथक सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस अमंलदार बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडित यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.