पिंपरी : टपरी चालकाने गुंडांना खंडणीचा हप्ता देण्यास नकार दिला. त्या कारणावरून एका टोळक्याने टपरी चालक आणि त्याच्या दोन मित्रांना पिस्टलचा धाक दाखवून कोयत्याने वार करून सोन्याच्या साखळ्या दरोडा घालून लुटला.
ही घटना 8 ऑगस्ट रोजी रात्री खेड तालुक्यातील भांबोली येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्केट चौकात घडली. या प्रकरणातील सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. टोळीचा म्होरक्या पत्नीसह उत्तर प्रदेश येथे पळून जात असताना महाळुंगे पोलिसांनी त्याला टिटवळा येथून अटक केली.
संतोष मधुकर मांजरे (वय 31, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड) असे अटक केलेल्या टोळीच्या म्होरक्याचे नाव आहे. त्याच्यासह आकाश बाळासाहेब शेळके (वय 25, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड), गणेश बबन डांगले (वय 20, रा. गवारवाडी, पाईट, ता. खेड), नारायण सुनील घावटे (वय 21, रा. शेलू, ता. खेड), गणेश हिरामण लिंभोरे (वय 20, रा. शेलू, ता. खेड), विठ्ठल नवनाथ पिकळे (वय 21, रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड), साईनाथ रामनाथ राऊत (वय 30, रा. भांबोली, ता. खेड) या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.
प्रदीप अरुण पडवळ (रा. बोरदरा, आंबेठाण, ता. खेड), सुमित भोकसे (रा. सरमकुंडी, ता. खेड) आणि अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अक्षय किसन कोळेकर (वय 24) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय याची खेड तालुक्यातील भांबोली येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्केट चौकात पान टपरी आहे. ही पान टपरी चालू ठेवायची असेल तर प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये हप्ता दे अशी आरोपींनी अक्षय यांच्याकडे मागणी केली.