पुणे : गोपीनाथ मुंडे जर आज हयात असते तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले. यावर भाजपचे प्रवीण दरेकर यांनी रोहित पवार यांना टोला मारला आहे. रोहित पवार यांनी आधी त्यांच्या घरातील अजित पवार, सुप्रिया सुळे की स्वतः मुख्यमंत्री होणार यावर एकमत करावं आणि मग हयात नसलेल्या व्यक्ती विषयी बोलावं, असे म्हटल आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना 2014 साली खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते, जर आज गोपीनाथ मुंडे हयात असते तर राजकारणाची पातळी इतकी घसरली नसती असे ते म्हणाले होते. त्यावर दरेकर यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरेकर म्हणाले, रोहित पवार अजून लहान आहेत. उगीच वाद निर्माण करू नये असं अजित पवारांनी मी सांगतात ते त्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.
महागाईवर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, सरकारने महागाईवर पूर्णपणे नियंत्रण आणले आहे. केंद्र सरकार सध्या उत्तम रित्या काम करत आहे. पेट्रोल – डिझेलच्या किमती ही आटोक्यात आणण्यात केंद्राला यश आले आहे. आता राज्य सरकारनेही सेस कमी करून महागाई कमी करण्यास मदत करावी, असे देखील ते यावेळी म्हणाले.