मुंबई : अजूनही राज्यातील लाखो गोरगरीबांना 100 रुपयांचा शिधा मिळालेला नाही. दिवाळीनंतर शिधा मिळणार का? दिवाळीनंतर हा शिधा मिळून काय फायदा?, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर केली आहे.
आज पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, राज्य सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे लाभार्थींना तातडीने 100 रुपयांचा शिधा मिळणे आवश्यक आहे. अजूनही अनेक भागांमध्ये हा शिधा पोहोचलेलाच नाही. त्यातही कोणत्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा मिळणार, याबाबतही संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. मध्यमवर्गीयदेखील महागाईच्या चटक्याने होरपळले आहेत. आम्हाला हा शिधा का नाही, असा सवाल मध्यमवर्गीय करत आहेत.
अजित पवार म्हणाले, सर्व गरीब व मध्यमवर्गीयांना शिधा मिळणे आवश्यक आहे. सरकारने याकडे तातडीने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. वृत्त वाहिन्यांवर अनेक महिलांनी अजून शिधा मिळाला नसल्याचे सांगितले आहे. हे सरकारचे अपयश आहे. सर्वसामान्यांसाठी एखादा कार्यक्रम राबवताना सरकारने व्यवस्थित नियोजन करावे. मात्र या योजनेत सरकारचा नियोजनशुन्य कारभार दिसत आहे.
अजित पवार म्हणाले की, सरकार 100 रुपयांच्या शिधामध्ये एक किलो रवा, तांदूळ, डाळ आणि तेल देत आहे. मात्र, अनेक ठिकाणी या 4 वस्तू एकत्र मिळत नाहीये. काही ठिकाणी केवळ 3 वस्तू तर काही ठिकाणी केवळ 2 वस्तू मिळत आहेत. नंतर उर्वरित वस्तू देऊ, असे सांगितले जात आहे. मात्र, दिवाळीनंतर या वस्तू मिळून काय फायदा?
अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री सर्वसामान्यांना शिधा मिळत असल्याचे म्हणत आहे. मात्र, अनेक ठिकाणी त्यांचा काळाबाजार होत असल्याचे समोर येत आहे. हा 100 रुपयांचा शिधा काही जण 200 ते 300 रुपयांना विकत आहे. हे अतिशय चुकीचे असून सरकारने याकडे बारीक लक्ष देणे गरजेचे आहे. लोकांच्या दिवाळीत असा व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई केली पाहीजे.