दुधाच्या खरेदी दरात ३ रुपये तर विक्री दरात २ रुपयांची वाढ
पुणे : दूध पावडर व बटर यांचे वाढलेले दर त्यामुळे दूधाची वाढती मागणी व कमी उत्पादन लक्षात घेता दुधाच्या खरेदी दरात ३ रुपये तर विक्री दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कात्रज डेअरी येथे दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत चर्चा होऊन दूध खरेदी दरात वाढ झाल्याने दूध विक्रीदर वाढविणे क्रमप्राप्त झाल्याने विक्री दरात देखील वाढ करण्याचा विचार झाला. मात्र, ग्राहकांवरील दरवाढीचा बोजा कमी व्हावा या हेतूने विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करुन विक्री कमिशन कमी करुन तसेच खर्चात बचत करुन एक रुपयाचा बोजा डेअरी व्याववसायिकांनी सोसावा असा निर्णय घेण्यात आला आहे.
पशुखाद्य, इंधन दरात झालेली वाढ यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना दूध व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर दूध-खरेदी विक्रीच्या दराबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती कात्रज डेअरीचे कार्यकारी संचालक विवेक क्षीरसागर यांनी दिली. दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महानंद, चितळे, गोवर्धन, गोविंद, ऊर्जा, शिवामृत, कात्रज, राजहंस, स्फुर्ती, सोनाई, शिवप्रसाद, नेचर डिलाईट, रिअल डेअरी, एस. आर. थोरात, अनंत, संतकृपा, सुयोग इत्यादी सहकारी व खाजगी दूधव्यावसायिकांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी गोपाळराव म्हस्के यांची पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, रणजित देशमुख यांची संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्षपदी निवड झाल्याद्दल तसेच संजीवराजे निंबाळकर यांची श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कल्याणकारी संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.