राहुल प्रसाद गाैंड (३३, रा. रुपीनगर, निगडी), बालाजी गोरख बाबर (२३, रा. थेरगाव), तुकाराम अर्जून मगर (३०, रा. काळेवाडी फाटा), प्रवीण दशरथ दळवे (२५, रा. चाकण) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यासह इतर दोन आरोपींच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, गाैंड हा काळेवाडी येथील आशीर्वाद सायबर कॅफेत विविध कागदपत्रे बनावट तयार करून देतो, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. गाैंड याच्या व्हाटसअपवर त्याचे इतर साथीदार माहिती देत होते. त्यावरून गाैंड हा संगणकावर बनावट नाव, दिनांक, शिक्के, सिरीयल क्रमांक व फोटो तयार करून त्याची प्रिंट काढून त्याच्याकडील बनावर शिक्के मारून कलर झेराॅक्स प्रिंट काढून त्याचा फोटो व्हाटसअपव्दारे त्याच्या इतर साथीदारांना पाठवून देत असे. तसेच त्यांच्याकडून गुगल पेव्दारे पैसे स्वीकारत होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल व संगणकामधील माहिती डिलिट करत होता.
संगणकावर बनावट कागदपत्रे तयार करीत असताना आरोपी ग़ाैंड याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी तीन हजार ८८० रुपयांची रोकड, एक लाख १० हजार ४०० रुपयांचे बनावट कागदपत्रे तयार करण्याचे साहित्य, सात हजारांचा मोबाईल फोन, ३०० रुपये किमतीचे तीन बनावट रबरी स्टॅम्प, असा एकूण एक लाख २१ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक निरीक्षक निलेश वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.