परभणी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता याचा काहीसा त्रास आता ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराना होणार आहे. कारण इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) करून घेणे बंधनकारक असल्याचे परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर स्पष्ट केले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक सर्व ठिकाणी उमेदवार लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिलाय. परभणी जिल्ह्यात 566 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या प्रचाराच्या निमित्त सभा, कॉर्नर सभा आणि प्रत्येकाच्या भेटीगाठी होणार आहेत. त्यामुळे या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यात येत असलेल्या नामनिर्देशन केंद्रावर इच्छुक उमेदवार आणि प्रतिनिधींनी त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे.
परभणी जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी दररोज रुग्णांची नोंद होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने हा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर नामनिर्देशन केंद्रावर किंवा संबंधित उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.