धावपटू पी टी उषा, संगीतकार इलैयाराजा ‘बाहुबली’चे लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांना राज्यसभेचे नामांकन
नवी दिल्ली : उड्डाणपरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या पी टी उषा, संगीतकार इलैयाराजा, सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र हेगडे आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद गुरु यांना राज्यसभेसाठी नामांकन देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आहे.
पीएम मोदींनी ट्विट करून पीटी उषा यांचे राज्यसभागृहात जाण्याबद्दल अभिनंदन केले आहे. पीटी उषाचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले, कि पीटी उषा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी सर्वत्र प्रसिद्ध आहे. परंतु, नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करणारे त्यांचे कार्यही तितकेच कौतुकास्पद आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित झाल्याबद्दल अभिनंदन.
तसेच, पंतप्रधानांनी गायक आणि संगीतकार इलैयाराजा यांच्यासाठी लिहिले, की त्यांच्या सर्जनशील प्रतिभेने पिढ्यानपिढ्या लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या रचना अनेक भावनांचे सुंदर चित्रण करतात. त्यांचा जीवनप्रवास तितकाच प्रेरणादायी आहे – तो एका विनम्र पार्श्वभूमीतून उठला आणि त्याने बरेच काही साध्य केले. त्यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे.
वीरेंद्र हेगडे हे त्यांच्या समाजसेवेसाठी ओळखले जातात, असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, कि वीरेंद्र हेगडे हे उत्कृष्ट समाजसेवेत आघाडीवर आहेत. मला धर्मस्थळ मंदिरात प्रार्थना करण्याची आणि आरोग्य, शिक्षण आणि संस्कृतीत ते करत असलेल्या महान कार्याचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. यासोबतच ते आता संसदीय कामकाज नक्कीच समृद्ध करतील. त्यांनी आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्रात अनेक महत्त्वाची कामे केली आहेत.
व्ही. विजयेंद्र प्रसाद यांना देखील राज्यसभेवर पाठवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. व्ही. विजयेंद्र प्रसाद हे प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहेत. तेलुगू चित्रपटसृष्टीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. याशिवाय ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ सारख्या पॅन इंडिया चित्रपटांच्या स्क्रिप्टही त्यांच्या लेखणीने लिहिल्या आहेत. व्ही. विजयेंद्र प्रसाद दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचे वडील. त्यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबतची माहिती शेअर करताना पीएम मोदींनीही त्यांची छान ओळख करून दिली आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले, कि ‘व्ही. विजयेंद्र प्रसाद हे सर्जनशील जगाशी अनेक दशकांपासून जोडले गेले आहेत. त्यांच्या कलाकृतींतून भारताच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडते आणि जागतिक स्तरावर त्यांचा ठसा उमटला आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित झाल्याबद्दल अभिनंदन.