पुणे : सराईत गुन्हेगाराच्या खूनानंतर समर्थकांनी अंत्यविधीला काढलेली दुचाकी रॅली महागात पडली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी निष्काळजीपणा बाळगल्या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह गुन्हे पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभीरे यांची आर्थिक व सायबर गुन्हे येथे तर गुन्हे निरीक्षक राजेंद्रकुमार कदम यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. स्वाती देसाई यांची सहकारगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत रस्तोरस्ती पोलीस बंदोबस्त असताना संचारबंदीच्या कालावधीत अंत्ययात्रेत दुचाकी रॅलीचा प्रकार घडल्यामुळे पोलीस आयुक्तांनी सर्वांची हजेरी घेतली.
एवढेच नाही तर शहरातील सर्व पोलीस उपायुक्तांची तातडीने बैठक घेतली होती. पोलीस नाकाबंदीत असताना बिबवेवाडी परिसरातील सराईत माधव वाघाटेचा खून झाल्यानंतर सहकानगर आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेकेडो समर्थकांनी दुचाकीची रॅली काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.
याप्रकरणी सहकारनगर आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा व विना परवानगी रॅली काढल्याप्रकरणी 150 ते 200 जणांविरूद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी पथके स्थापन करून 96 पेक्षा अधिक जणांना अटक करून त्यांची रवानगी येरवाडा कारागृहात केली आहे.