शिर्डी : साई संस्थानची नवी नियमावली नाताळ सुट्ट्यांसाठी जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन पासशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. दर्शन पास संस्थानच्या वेबसाईटवरून घेणे अनिवार्य असणार आहे. १२ हजार भाविकांना दररोज प्रवेश देणे शक्य होणार असल्याचे म्हटले आहे.
राज्य सरकारच्या आदेशानंतर पाडव्याच्या मुर्हूतावर लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेले शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. या मंदिरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका दिवसात दररोज सहा हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जात होता. त्यानंतर दररोज साधारणपणे आठ ते नऊ हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा, यादृष्टीने शिर्डी संस्थानने नियोजन सुरू केले होते. त्याप्रमाणे आता शिर्डी संस्थानने नाताळकरिता नवी नियमावली जाहीर केली आहे.