दिल्ली : माओवाद्यांना नक्षली कारवायांमध्ये मदत केल्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली आहे. साईबाबा हे दिव्यांग असून, ते व्हीलचेअरवर असतात.
साईबाबांना गडचिरोली सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली होती. याला त्यांनी नागपूर उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज शुक्रवारी न्या. रोहित देव आणि न्या. अनिल पानसरे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांनी साईबाबांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. या निर्णयाचे ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी स्वागत केले आहे.
देशाविरोधात युद्ध पुकारने, माओवाद्यांशी संबंध, माओवादी कारवायात सक्रिय सहभाग असल्याचा आरोप करत साईबाबा यांना 2015 मध्ये अटक झाली. त्यांच्यासोबत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एक विद्यार्थी आणि एका पत्रकारासह पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.
साईबाबा आणि एकूण पाच जणांवर खटला चालला. 2017 मध्ये गडचिरोली सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात साईबाबांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. 29 सप्टेंबर यावर सुनावणी होऊन न्यायालायने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज पाच जणांची सुटका करण्याचे आदेश दिले. यातील एकाचा तुरुंगात असताना मृत्यू झालाय.