पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई जोरात सुरु आहे. यातच पुण्यातील उच्चभ्रू असणाऱ्या बावधन परिसरात चक्क किराणा दुकानात गांजाची विक्री होत असल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी प्रेमसिंग रतनसिंग चंपावत (३८, रा़.हिराई निवास, पाटीलनगर, बावधन) याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीवरुन पोलीस बावधनमध्ये कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांना चक्क एका किराणा दुकानात व फ्लॅटमधून गांजा विक्री होत असल्याचे आढळून आले. या दोन्ही ठिकाणाहून पोलिसांनी १५ किलो ८०९ ग्रॅम गांजा, मोबाईल, वजनकाटा, गांजा भरुन ओढण्याच्या उपयोगाचा गोगो, रोख रक्कम असा ४ लाख ५८ हजार ९१५ रुपयांचा माल जप्त केला आहे.
चंपावत हा मुळचा राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील राहणारा आहे. त्याचे हिराई निवास या बिल्डिंगमध्ये वेलकम सुपर मार्केट असून त्याच ठिकाणी फ्लॅट नं.८४ मध्ये तो राहतो. दुकान व घरातून पोलिसांनी गांजा जप्त केला आहे. राजस्थानमधून तस्करी करुन तो गांजा आणत असल्याचा पोलिसांना संशय आहे. तपास पोलीस करत आहेत.