दिघी : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हावादग्रस्त वक्तव्य केले आहे. 15 ऑगस्ट हा काळा दिवस असल्याचे म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. 15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नाही, या दिवशी फाळणी झाली होती, असे संभाजी भिडे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
पुण्यातील दिघी येथे रविवारी संभाजी भिडेंच्या यांच्या व्याखान होते. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेय. जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी भारताची फाळणी झाली. या दिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा. भारताचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा म्हणून स्विकारला जात नाही, तोपर्यंत शांत बसायचे नाही. आपली स्वातंत्र्यदेवता जोधाबाई सारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल, असे भिडे म्हणाले.
संभाजी भिडेंनी राष्ट्रगीतावर का घेतला आक्षेप ?
रवींद्रनाथ टागोरांनी 1911 मध्ये ‘जन गण मन’ची रचना केली आहे. टागोरांनी रचलेल्या गीतात पाच कडवी, राष्ट्रगीत म्हणून एकच कडवं स्वीकारलं. जन गण मन 1911 मध्ये भारतात भरलेल्या दिल्ली दरबारसाठी रचल्याचा आरोप आहे. हे गीत दिल्लीत भरलेल्या दरबारात ब्रिटन सम्राट जॉर्ज पंचमला भारत सम्राट जाहीर केलं जातं होतं त्यासाठी रचलेल्याचा आरोप केला जात आहे.
वाचा-देवेंद्र फडणवीसांची यावर प्रतिक्रिया
भारताला राजकीय स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 लाच मिळालेले आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात हे शल्य आहे की, त्यादिवशी भारताची फाळणी झाली, विभागणी झाली. आपल्याला अखंड भारत पाहायचा आहे. अखंड भारत होईल, तेव्हाच समाधान होणार आहे. पण याचा अर्थ 15 ऑगस्ट 1947 भारताचा स्वातंत्र्य दिवस नाही, हे त्या अर्थाने कुणी म्हणत असेल तर योग्य नाही. तोच आपला स्वातंत्र्य दिवस आहे, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.