मुंबई : आर्यन खान प्रकरणात NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सीबीआयने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) मुंबई झोनच्या माजी संचालकाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अडकवण्यात येणार नसल्याच्या बदल्यात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडेवर आहे.
एफआयआरनुसार, समीर वानखेडेच्या सांगण्यावरून गोसावीने आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची मागणी केली होती. या रकमेच्या बदल्यात आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते.
एफआयआरच्या प्रतीनुसार, समीर वानखेडे यांनी गोसावी यांना सौद्याच्या पैशाच्या प्रकरणात संपूर्ण सूट दिली होती. गोसावी यांनी 18 कोटींचा सौदा पक्का केला होता. एवढेच नाही तर गोसावी यांनी 50 लाख रुपये अॅडव्हान्सही घेतले होते.
तपासात समीर वानखेडेने यांनी आपल्या परदेश प्रवासाबाबत योग्य माहिती दिली नव्हती. त्यांनी त्यांच्या महागड्या घड्याळ आणि कपड्यांबद्दल सत्य देखील सांगितले नाही. समीर वानखेडे यांच्या बेहिशोबी मालमत्तेचाही एफआयआरमध्ये उल्लेख आहे
12 मे रोजी समीर वानखेडेवर मोठ्या कारवाईत सीबीआयने त्यांच्या घरावर छापा टाकला होता. सीबीआयच्या पथकाने वानखेडे यांची त्यांच्या मुंबईतील घरी 13 तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. सीबीआयचे अधिकारी वानखेडेचे वडील, सासरे आणि बहीणच्याही घरी पोहोचले होते.
आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. समीर वानखेडेंच्या घरी सीबीआयचा छापा; आयर्नखानच्या नातेवाईकांना लाच मागितल्याचे प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने अहवाल दिल्यानंतर सीबीआयने हे पाऊल उचलले. यासह कार्डेलिया क्रूझ केसमध्ये लाच मागितल्याच्या प्रकरणी वानखेडेंसह इतरांवरही बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.