भोर (माणिक पवार) : काही पोलिस कर्मचाऱ्याच्या हलगर्जीमुळे दरोड्यातील दोन आरोपींनी कोठडीचे गज कापून पलायन केले. याचा ठपका नाहक पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांना भोगावा लागल्याची चर्चा झडत असतानाच वेताळ यांची बदली करण्यात आली आहे. वेताळ यांची जागी पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली असून घोरपडे यांनी पदभार स्वीकारला आहे.
नसरापूर ( ता. भोर ) येथील राजगड पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी लोणावळा येथील पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांनी त्यांचा सत्कार करून पदभार दिला असून घोरपडे यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी उपनिरीक्षक निखिल मगदूम, राहुल साबळे, कुंडलिक माने, भगीरथ घुले, गणेश लडकत, महेश खरात, राहुल कोल्हे, महिला पोलिस प्रतिमा भांड, हेमा भुजबळ, शीतल रणखांबे, वाहतूक पोलीस कर्मचारी तसेच भोर तालुका पत्रकार संघाचे किरण भदे, वैभव भुतकर, माणिक पवार, तसेच नसरापूर ग्रामपंचायतीचे सदस्य इरफान मुलाणी, ज्ञानेश्र्वर झोरे यांनी घोरपडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर निरोपाच्याप्रसंगी मावळते पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांचाही उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, मावळते पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी २६/११ च्या मुंबई अतिरेकी हल्ल्यात उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. त्यांनी कमी कालावधीमध्ये राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वचक ठेवले होते. तर संदीप घोरपडे यांनी यापूर्वी सिंधुदुर्ग, पुणे गुन्हे शाखा व लोणावळा आदी ठिकाणच्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला असून घोरपडे यांची गुन्हेगारांचे कर्दनकाळ, शिस्तप्रिय म्हणून ओळख असून अनेक गंभीर गुन्ह्याची उकल त्यांनी उघड केली आहे. राजगड पोलीस हद्दीत सुरू असलेली अनेक बेकायदाधंदे मोडीत काढणार असल्याचे सांगितले.