मुंबई : टिकटॉक गर्ल पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंध जोडले गेलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्विकारला. या प्रकरणात विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू केले असून यातूनच राठोड यांचा बळी गेला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पूजाच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड कमालीचे अडचणीत आले होते. सर्व बाजूंनी घेरले गेलेले राठोड हे रविवारी दुपारी सपत्नीक वर्षा बंगल्यावर गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी पूजाची आजी शांताबाई राठोड, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई उपोषणाला बसल्या आहेत. मात्र, शांताबाई राठोड यांचा आमच्या कुटुंबाशी कोणतेही रक्ताचे नाते नाही, असे पूजाच्या आई-वडिलांनी आपल्याला सांगितले असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.