संजय राऊत अजित पवार यांना महाविकास आघाडीतून बाहेर काढणार : भाजपा खासदार

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे अजित पवारांना महाविकास आघाडीतून बाहेर काढणार, असा गौप्यस्फोट भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा जोरदार चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयात लागणारा संभाव्य निकाल, त्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू झालेल्या हालचाली, या तोंडावर खासदार अनिल बोंडे यांनी हे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे आज सकाळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्याचीही चर्चा सुरू आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे खासदार अनिल बोंडे यांनी आज शरद पवारच अजित पवारांना महाविकास आघाडीतून बाहेर काढण्यास इच्छुक असल्याचे म्हटल्याने खळबळ उडाली आहे. बोंडे म्हणाले की, शरद पवारांच्या सांगण्यावरूनच संजय राऊत अजित पवारांना महाविकास आघाडीतून बाहेर काढतील. संजय राऊतांना कंटाळूनच शिवसेनेच्या 40 आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला. आता अजित दादाही महाविकास आघाडी सोडतील. महाविकास आघाडी फुटण्यासाठी संजय राऊत कारणीभूत असतील. त्यांची थोरवीच मोठी आहे, अशा शब्दांत त्यांनी तोंडसुख घेतले.

‘सामना’च्या रोखठोकमधून संजय राऊत यांनी शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या मार्गावर असल्याचे म्हटले होते. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा संदर्भा दिला होता. मात्र, अजित पवारांनी राऊतांचे नाव न घेता आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचे तुम्हाला कोणी वकील पत्र दिले? असा सवाल केला होता. त्यावर राऊतांनी ‘मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, मी अजित पवारांचे का ऐकून घेऊ, माझ्यासाठी शरद पवारांची भूमिका महत्वाची. मी फक्त शरद पवारांचे ऐकतो. शिवसेना फुटली तेव्हा मी आमचीच वकील केली, अशा शब्दांत अजित पवारांना प्रत्युत्तर दिले. आता आज अजित पवारांनी कोण संजय राऊत? मी कोणाचेही नाव घेतले नव्हते. त्यामुळे कोणाला लागण्याचे कारण नाही. मी माझ्या पक्षासंदर्भात बोलल्याची टोलेबाजी केली आहे. राऊत आणि पवार यांच्यातला कलगीतुरा पाहता बोंडेंनी हे भाष्य केले.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा अनेकदा असतात. ते मध्यंतरी नॉटरिचेबल राहिल्याच्या चर्चाही रंगल्या. मात्र, अजित पवार यांनी स्वतःच्या तब्येतीचे कारण पुढे केले. विशेष म्हणजे अजित पवारांनी मोदींच्या डिग्रीवरूनही त्यांची पाठराखण केली होती. त्यांना जनतेने डिग्री पाहून निवडून दिले नसल्याचे विधान त्यांनी केले. त्यांनी एकेदिवशी आपले कार्यक्रम अचानक रद्द केल्याच्या बातम्या रंगल्या. मात्र, त्यानंतर आपले तसे काही कार्यक्रमच नव्हते, अशी सारवासारव अजित पवारांना करावी लागली. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.