मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या चिरंजीवाशी पार पडला. यावेळी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.
ग्रँड हयातमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी राऊत आणि नार्वेकर कुटुंबीयांखेरीज काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. अत्यंत साध्या पण प्रसन्न वातावरणात हा सोहळा पार पडला. साखरपुडा होताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव उमटले होते.
साखरपुड्यासाठी पूर्वशी आणि मल्हार खास मराठमोळ्या वेषात आले होते. पूर्वशी यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती. त्यांनी हातात शेला धरला होता. तर मल्हार हे पेशावाई पेहरावात आले होते. तर, संजय राऊत आणि राजेश नार्वेकर यांनी कुर्ता, सदरा परिधान केला होता.
साखरपुड्यासाठीचा स्टेज अत्यंत साधा, पण आकर्षक करण्यात आला होता. श्रीगणेशाच्या आकृतीच्या पृष्ठभूमीवर फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्नमय झालं होतं.