संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न

0

पिंपरी : कोरोना महामारीनंतर संत तुकाराम महाराजांचा 374 वा सदेह वैकुंठगमन सोहळा लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यावर्षी उत्साहात साजरा झाला. राज्यभरातील लाखो वारकरी भाविक तुकोबांच्या चरणी लीन झाले.

बीज सोहळ्यानिमित्त संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या वतीने देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. रविवारी (दि. 20) पहाटे संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात मुख्य विश्वस्त, विश्वस्त यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता तुकाराम महाराजांची पालखी मुख्य मंदिरातून बाहेर काढण्यात आली.

सकाळी साडेअकरा वाजता पालखी वैकुंठगमन मंदिरात पोहोचली. एक तासाच्या कालावधीत अनेकांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. वैकुंठगमन मंदिर परिसरात बापू महाराज मोरे यांचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी बारा वाजता संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन सोहळा पार पडला.

बीज सोहळ्यासाठी लाखो भाविक देहुनगरीत दाखल झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निर्बंध शिथिल झाले. त्यानंतर बीज उत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच पीएमपीएमएल आणि प्रशासनाने वारक-यांची योग्य सोय केली होती. देहू, आळंदीकडे जाण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातून ज्यादा बसेसची सोय करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.