कुख्यात गुंड गजा मारणेला सातारा पोलिसांनी केले जेरबंद

पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड पोलीस होते मागावर

0

सातारा : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावर मिरवणूक काढल्याने पोलिसांच्या डोळ्यात आलेल्या कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या समर्थकांवर कारवाई सुरु आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पाठवलेला गुंड गजा मारणेचा एमपीडीएचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंजूर केला. पुणे जिल्ह्या सोडून सातारा जिल्ह्यात फिरत असलेल्या गजा मारणे याला सातारा पोलिस दलातील मेढा पोलिसांनी जावली परिसरातून स्थानबद्ध केले.

तळोजा जेलमधून निर्दोष सुटलेल्या गजा मारणे याने जेलमधून शक्ती प्रदर्शन करत महामार्गावर धुडगूस घातला होता. त्याप्रकरणी पुणे शहर पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस तसेच खलापूर येथे त्याच्या व साथीदारांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. एका गुन्ह्यात त्याला अटक केली मात्र कोर्टाने त्याला जामिनावर सोडला. त्यानंतर दुसऱ्या एका गुन्ह्यात तो पोलिसांना चकवा देत वडगाव मावळ कोर्टात दाखल झाला आणि तेथून जामीन मिळवला. त्यानंतर पुन्हा त्याच्यावर दरोडा आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला.

याच कालावधीत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गजा मारणे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पाठवण्यात आला. त्यांनी दि. 2 मार्च रोजी हा प्रस्ताव मंजूर केला.पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांसह पोलिस दल त्याच्या मागावर होते. गुंड गजा मारणे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर परिसरात आल्याची खबर सातारा पोलिस दलाला मिळाली होती. शनिवारी जावळी तालुक्यातील मेढा परिसरात गजा मारणे आला असल्याची माहिती पोलिसांना लागली.

मेढा शहरात क्रेटा गाडीतून तो फिरत असताना सापळा रचत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी गुंड गजा मारलेला सापळा रचत जेरबंद केला. त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातील क्रेटा गाडी व रोख दीड लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. गजा मारणेसह सुनील बनसोडे, संतोष शेलार, सचिन घोलप यांना ताब्यात घेण्यात आले आहे. एमपीडीए अंतर्गत गजा मारणे याची थेट तुरूंगात रवानगी केली जाणार आहे. या कारवाईचा कालावधी एक वर्षाचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.