काटी : मद्यधुंद चालकाने 13 वर्षीय शाळकरी मुलाला चिरडल्याची घटना काटी-वडापुरी रोडवरती छोट्या कॅनल नजिक 29 जुलैच्या सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली.
या घटनेमुळे घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. मुलीला चिडल्यानंतर मद्यधुंद चालकास जमावाने ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.
तुप्ती नाना कदम (वय 13 वर्ष) या विद्यार्थीनीचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर गणेश नाना कदम वय 10 वर्षीय विद्यार्थ्याला डोक्यात जबर मार लागल्याने इंदापुर येथील कदम बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
श्री काटेश्वर विद्यालय काटी येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत होते. इयत्ता सातवी व पाचवीमध्ये शिक्षण घेत होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्याचे चुलते दुचाकीवरून शाळेत सोडवण्यासाठी जात असताना काटी वडापुरी रोडवरती खडीचा ओव्हरलोड टिपर (क्रमांक एम.एच. 42 टी. 1653) हा घेऊन मद्यधुंद चालकाने पाठीमागून दुचाकीस जोरदार धडक दिली. यामध्ये तुप्ती व गणेश रस्त्यावरती पडले. चालक मद्यधुंद असल्याने धडक देऊन गाडीला ब्रेक न मारता डंपर तसाच साठ ते सत्तर फुटांपर्यंत नेला. डंपर तसाच पुढे गेल्याने तुप्ती पाठीमागच्या चाकाखाली येऊन तिचा जागीच मुत्यू झाला. तर गणेशच्या डोक्याला मार लागून तोही जबर जखमी झाला आहे. तर चुलता किरकोळ जखमी झाला आहे.
इंदापुर तालुक्यात ओव्हरलोड गाड्या व मद्यधुंद चालक बेफिकीर निष्पाप चिमुरड्याचे जिव घेत असताना प्रशासन मात्र कारवाईचा कोणताही बडगा उचलताना दिसत नाही. चालकाबरोबर प्रशासनही मद्यधुंद अवस्थेत आहेत का, असा सवाल संतप्त चिमुरड्याचे पालक विचारत आहेत.