पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील सर्व शाळांची तपासणी होऊ शकली नाही. तसेच अनेक शिक्षकांचा करोना चाचणीचा अहवालही प्राप्त न झाल्याने अनेक शाळा बंद राहणार आहेत. आज सोमवारी महापालिकेच्या आणि खासगी शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. राज्यभरातील शाळा सुरू झाल्या, पण पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. यापूर्वी दोन वेळा शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलावा लागला. मात्र, तिसऱ्या वेळेस महापालिका प्रशासनाने 4 जानेवारीपासून शहरातील शाळा सुरू होणार असल्याचे सांगितले.
शाळा सुरू करताना पालकांचे संमतीपत्र, शाळांनी केलेल्या उपाययोजना हा महत्वाचा भाग होता. महापालिकेच्या शाळेसह खासगी शाळांमधून पालकांकडून संमतीपत्र घेण्याचे काम अजूनही सुरूच आहे. शाळांमध्ये सॅनिटायझेशन, थर्मल गन, ऑक्सिमिटर, वर्गामधील बसण्याची व्यवस्था याचे नियोजन झाले आहे. पण शिक्षकांच्या करोनाच तपासणीचा अहवाल अद्याप मिळालेला नसल्याने शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.