पुणे : राज्यातील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राज्यभरात सुरू आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्र कधी सुरू तर कधी बंद असं चित्र पाहायला मिळत होतं. यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आजपासून 111 केंद्रांवर 45 वर्षांच्यावरील नागरिकांचं लसीकरण होणार असल्याची माहिती दिली आहे. तर 6 केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणात लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं.
ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस यापूर्वीच घेतलाय आणि त्यांना दुसरा डोस आता घ्यायचा आहे. अशा व्यक्तींना प्राधान्य देत आजपासून दुसऱ्या लसीचा डोस देण्यासाठी लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी नोंदणी केलेली आहे. अशाच नागरिकांना लसीकरण केंद्रावर लस मिळणार आहे.
लसीकरण केंद्रावर विनाकारण गर्दी करू नये, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. तसेच नोंदणी केली नसल्यास कोणालाही लस मिळणार नाही. हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. यामुळे आता कोरोना रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं पहायला मिळत असलं तरी लसीकरण मोहीम आणखी वेगाने पुढे नेण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे.